पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. मंगळवारी आणि बुधवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. महापालिका ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या भोसरी, शांतीनगर, संत तुकाराम नगर, दिघी, बोपखेल, मॅगझीन, वडमुखवाडी (काही भाग), गजानननगर, बी.यु.भंडारी, इंद्रायणीनगर टाकी परिसरातील पाणीपुरवठा ३ सप्टेंबर २०२४ रोजी बंद राहणार आहे. तसेच ४ सप्टेंबर २०२४ रोजी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार असल्याची माहिती ई क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
थरमॅक्स चौकात गळती थरमॅक्स चौक येथे महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीतुन मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवार ३ सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याने भोसरी, शांतीनगर, संत तुकाराम नगर, दिघी, बोपखेल, मॅगझीन, वडमुखवाडी (काही भाग), गजानननगर, बी.यु.भंडारी, इंद्रायणीनगर टाकी परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुरूस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार ४ सप्टेंबर रोजी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे.
पाणी जपून वापरा
नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन ई क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.