पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पवना नदी सुधार प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू असताना नदीमध्ये भराव टाकण्याचे प्रमाण वाढत आहेत. हे भराव रोखण्यात महापालिका प्रशासनाला अपयश येत आहे. काळेवाडी आणि रावेत परिसरातील नदीत भराव टाकला जात आहे. मात्र, राडारोडा आणि भरावाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पवना नदीचा गळा आवळला जात आहे.
स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी म्हणून पवनामाईचे महत्त्व आहे. मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा केला जातो. पवना नदीची महापालिका हद्दीतील एकूण लांबी २४.३४ किलोमीटर आहे. धरणातून थेट नदीत पाणी सोडले जाते आणि रावेत येथील उपसा केंद्रातून पाणी उचलून निगडी प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे प्रक्रिया करून शहरातील नागरिकांना पिण्यासाठी जलवाहिन्यांच्या माध्यमातून पुरविले जाते. पवना नदी प्रदूषणाबरोबरच आता नदीपात्र अरूंद करण्याचा नवा प्रश्न निर्माण होत आहे. उगम ते संगमापर्यंत अनेक ठिकाणी नदीचे पात्र अरूंद केले जात आहे. याकडे महापालिका, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पवना नदीपात्राच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. गृहनिर्माण सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. नवीन उपनगरे तयार होत आहेत. पवना धरणापासून अर्थात शिवणे ते रावेतपर्यंत शेतकऱ्यांनी नदीपात्रात भराव टाकले आहेत. तर २६ नाले थेटपणे नदीत सोडले आहेत.
रावेत, पिंपरी, काळेवाडी परिसरात नदीपात्रात राडारोडा-
पवना नदीचे पात्र किवळेपासून दापोडीपर्यंत आहे. यामध्ये शहर परिसरात नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, रावेत, वाल्हेकरवाडी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव आणि ताथवडे या भागात नदीलगतच्या भागांमध्ये गृहनिर्माण सोसायट्या होत आहेत. तर काही ठिकाणी शेतजमिनी आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्लॉट आहेत. तिथे नदीलगत भराव टाकण्याचे काम सुरू आहे. किवळेतून सांगावडेला जाताना पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर भराव टाकून प्लॉटची उंची वाढविली आहे.
पवनामाईच्या आरोग्यासाठी जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे प्रयत्न केले जातात. नद्यांचे पर्यावरण चांगले राहावे, प्रदूषण कमी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचबरोबर नदीपात्रात भराव टाकण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत उपाययोजना करायला हव्यात.
- राजेश भावसार, जलदिंडी प्रतिष्ठान