‘त्यांच्या’ संगीतात लोककला सूफी संगीत, पारंपरिक धून अशा संगीताचा साज आहे; पण ते संगीत इंडो फ्युजन प्रकारात मोडणारे असल्याने शास्त्रीय संगीताचे सूर कानावर पडणाऱ्या जुन्या रसिकांना ते सूर काहीसे ’हार्श’ वाटण्याची शक्यता आहे. पण, याच रॉक बँडने नव्वदीच्या दशकापासून आपला विशिष्ट चाहता वर्ग निर्माण केला. आजही तरुणाई त्यांच्या ‘बंदे’, ‘कन्निसा’सारख्या गाण्यांवर अक्षरश: तुटून पडते. ’इंडियन ओशन’ हे त्या रॉक बँडचे नाव. या बँडमधील प्रमुख गिटारिस्ट राहुल राम यांच्याशी साधलेला हा संवाद!
* पुण्यातील पहिलेच सादरीकरण झाले? हा अनुभव कसा होता?* पुण्यातील रसिकांसमोर सादरीकरण केल्यानंतर कला आणि कष्ट सार्थकी लागल्याची भावना प्रत्येक कलाकारामध्ये पाहायला मिळते. रसिक शास्त्रीय संगीतावर भरभरून प्रेम करतात. दिल्लीसारख्या शहरातही संगीत मैफलीसाठी एवढी गर्दी झालेली मी कधीच पाहिली नव्हती.* रॉक बँडच्या प्रसिद्धीचे गमक काय? आम्ही संगीताचे कोणतेही विशिष्ट प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे आमच्या कामात कोणतीही भिंत नाही, सर्व काही नैसर्गिक आहे.रॉक गायक शास्त्रीय संगीतात रुची बाळगत नाहीत. आम्हाला कोणतेच विशिष्ट गायन येत नसल्याने आम्हाला मर्यादा नाहीत,* हा अत्यंत अनोखा प्रयोग आहे.- गाणे हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना, जगण्यातूनच गाणे स्फुरते. आम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन लोकसंगीत ऐकले आणि त्यावरून गाणे तयार केले, असे होत नाही. मी नर्मदा बचाओ आंदोलनामध्ये ५ वर्षे सक्रिय होतो. त्या वेळी ‘मारेवा’ हे गाणे तयार झाले. ‘तमन्नू’ हे गाणे काकूने मला लहानपणी शिकवले होते. लोकसंगीताची गाणी आपल्या आयुष्याशी जोडलेली असतात. आम्ही ‘लावणी’ करायची म्हटली, तर ती आम्हाला जमणार नाही. कारण, गाणे आतून यायला हवे. ते अनपेक्षितपणे बाहेर पडते. गाण्याला शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत असे विभाजन करता येत नाही. फ्युजनबद्दल काय वाटते?- माझ्या दृष्टीने सर्व संगीत एक फ्युजनच आहे. बॉलिवूड हे एक संपूर्ण फ्युजन आहे. बॉलिवूडमध्ये इंडोनेशिया, साऊथ अमेरिका, इंडिया असे सर्व काही एकत्रित पाहायला मिळते.* बँड कल्चरबद्दल काय वाटते?- बँड संस्कृती झपाट्याने वाढत आहे. कारण, अनेक प्रकारची वाद्ये सहज उपलब्ध झाली आहेत. मी लहान असताना एवढी वाद्ये नव्हती. त्यांचा दर्जाही आजच्यासारखा नसायचा. गिटार आहे तर ड्रम नाही, अशी परिस्थिती असायची. आजकाल सर्व काही सहज उपलब्ध आहे. महोत्सवांची संख्या, कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वेगवेगळे सोलो आणि एकत्रित प्रयोग होत आहेत. * रॉक म्युझिक शिकण्याकडे तरुणांचा कल आहे ? मित्रांकडून रॉक म्युझिकबाबत माहिती मिळते, मित्र एकत्र येतात आणि रॉक म्युझिकची तयारी करतात. त्यांच्यासमोर इंटरनेटरूपी खजिना खुला आहे. त्यामुळे त्यांना पॅटर्न, बॅक्ग्राऊंड याचे सहज ज्ञान मिळते. त्यातून ते शिकतात. * काय संदेश द्याल?- स्वत:शी प्रामाणिक राहा, ‘प्युरिटी जपा’ एवढेच त्यांना सांगू इच्छितो.