पिंपरी : उक्ती आणि कृती वेगळी नको. मंचावर लोकांसमोर एक बोलायचे आणि आयुष्यात मात्र वेगळेच वागायचे हे चुकीचे आहे. सेवा करायची असेल तर ती नि:स्वार्थ भावनेने करायला हवी. आम्ही ज्या भागामध्ये कार्य केले त्या आदिवासी लोकांकडून समाजातील व्यवहार्यता शिकण्यासारखी आहे.आनंदवनातील कार्य हे इतके आनंद देणारे आहे की येथे भेट देणारे अनेक वेळेस म्हणतात की आनंदवनातील आनंद हा येथील कुष्ठरोगापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या वेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्षसतेज पाटील, संचालक डॉ. एस.के.जोशी आदी उपस्थित होते. या वेळी आमटे दाम्पत्याचा सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. शलाका पारकर यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. आमटे म्हणाले, ‘‘आदिवासी भागातील लोकांची व्यवहार्यता अंगीकारण्यासारखी आहे. तेथे समाजकार्याला सुरूवात केल्यापासून आजपर्यंत त्या भागात बलात्काराची घटना ऐकायला भेटली नाही. कुठलाही वाद स्थानिकांमध्ये झाला तर पंचायतीच्या एका बैठकीमध्ये निर्णय घेऊन योग्य निवाडा केला जातो. ही व्यवहार्यता त्यांनी टिकून ठेवली आहे.’’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘ शहरात सगळ््या सोयी-सुविधा होत्या. मात्र त्यांचा मोह कधी झाला नाही. बाबांसोबत लहानपणापासून त्यांचे कार्य पाहत होतो. त्यामुळे ते कार्य पुढे नेण्याची मनाची तयारी झाली होती. त्यामुळे ऐश्वर्याची लालसा कधीच झाली नाही.’’
उक्ती आणि कृती वेगळी नको- प्रकाश आमटे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 2:43 AM