वडगाव मावळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे तालुक्यात ७४ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या पाच गट आणि पंचायत समितीच्या १० जागांसाठी सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. वाढलेली टक्केवारी कोणाला फायदेशीर ठरते हे गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. सर्वच पक्षांनी केलेला हायटेक प्रचार, मतदारापर्यंत पोहोचण्याची लगबग, आरोप-प्रत्यारोपाचा लाभ कोणाला होतो हे काही तासांतच समोर येणार आहे. निकालासाठी काउंटडाउन सुरू झाल्याने उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. वडगाव खडकाळा या सर्वसाधारण जागेसाठी राखीव असलेल्या गटात राष्ट्रवादी, भाजपा व अपक्ष यांच्यात काट्याची लढत झाल्याने येथील निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अपेक्षित कौल मिळावा म्हणून आता उमेदवारांनीही देव पाण्यात ठेवले आहेत. दर्शन घेऊन देवाला साकडे घालण्यात येत आहे. उमेदवारांच्या समर्थकांमध्ये पैजा जोरात चालू झाल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. सत्ताधारी भाजपाच्या बालेकिल्ल्यात मतदान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे निकालाबाबत मोठी उत्कंठा निर्माण झाली आहे. विजयाबाबत कोणालाही ठामपणे दावा करता येऊ नये इतपत चुरशीच्या लढती काही गट आणि गणांमध्ये झाल्या. राष्ट्रवादीचे सुनील ढोरे, भाजपाचे रामनाथ वारिंगे व अपक्ष बाबुराव वायकर यांच्यातील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. भाजपाचे आमदार बाळा भेगडे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब नेवाळे, तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी जोरदार प्रचार केल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भारिप बहुजन महासंघ, बहुजन सोशालिस्ट पार्टी व काही अपक्ष उमेदवारांनीही जोरदार प्रचार करून निवडणुकीत रंगत आणली आहे. (वार्ताहर)
निकालाची उत्कंठा पोहोचली शिगेला
By admin | Published: February 23, 2017 2:37 AM