पिंपरी : आयटी पार्क हिंजवडी परिसरात या बनावट चलनी नोटा घेऊन माण गावात जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. शुक्रवारी (दि. १६) दुपारी बोडकेवाडी फाटा, माण - हिंजवडी रस्ता येथे पोलीसांनी ही कारवाई केली.
अभिषेक राजेंद्र काकडे (वय २०), ओंकार रामकृष्ण टेकम (१८, दोघे रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार श्रीकांत चव्हाण यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी पार्क हिंजवडीमधून माण गावात जाणाऱ्या रस्त्यावर बोडकेवाडी फाटा येथे संशयितरित्या तिघेजण थांबले असून, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटा आहेत, अशी माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या एक लाख २० हजार रुपये किमतीच्या चलनी नोटा आढळून आल्या. पोलिसांनी तपासून पाहिल्यावर नोटा बनावट असल्याचे समोर आले. या नोटा तसेच संशयितांकडील दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
परदेशातील लोकांचा सहभाग?
पिंपरी - चिंचवड शहरातील निगडी आणि पिंपरी भागात यापूर्वी बनावट नोटा जप्त केल्या आहेत. निगडी येथील घटनेत दोन बहिणींनी घरातच बनावट नोटा छापल्या प्रकरणी अटक केली होती. आता आयटी पार्क हिंजवडी परिसरात बनावट नोटा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणात परराज्य किंवा परदेशातील काही लोकांचा सहभाग आहे का, हे देखील पोलिसांकडून पडताळून पाहिले जात आहे.
घरातच छापल्या नोटा?
हिंजवडी - माण रस्त्यावर जप्त केलेल्या नोटांचा कागद उच्च प्रतीचा आहे. चलनातील ५०० रुपयांच्या नोटा आणि जप्त बनावट नोटांमधील फरक ओळखणे सहज शक्य होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त नोटांवरील क्रमांक एकच असल्याने या नोटा बनावट असल्याचे उघड झाल्याचे पोलिंसाकडून सांगण्यात येत आहे. घरातच उच्च प्रतीचा प्रिंटर वापरून या नोटा छापल्या असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच बरोबर या नोटांचा कागद देखील चलनातील नोटांसारखा असल्याने पोलिस सर्व बाबींचा अभ्यास करून तपास करीत आहेत.