तळेगाव दाभाडे : बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षापूर्वीची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलांचे संगोपन शेतकरी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने करत असतो. . त्यामुळे बैलाचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी करत याबाबत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
बैलगाडा शर्यत या विषयाबाबत पुणे येथे सर्व बैलगाडा संघटनांच्या प्रमुखांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भेट घेतली. बैलगाडा शर्यतीचे केसबाबत स्वत: लक्ष घालून, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित सुनावणी तात्काळ घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच बैलाचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केली.
यावेळी याचिकाकर्ते रामकृष्ण टाकळकर, भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, डॉ. ताराचंद कराळे, मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे, अध्यक्ष संभाजी अप्पा भेगडे, विश्वास शेटे, रवींद्र कडलक, दिनकर निवृत्ती भेगडे यांच्यासह गाडामालक उपस्थित होते.
शर्यत बंदीमुळे देशी गाय बैलांचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्यामुळे जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्याची परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे भेगडे यांनी निदर्शनास आणून दिले. तामिळनाडू व कर्नाटकमध्ये कायदा केलेला असूनही तेथील शर्यतीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने अद्याप बंदी घातलेली नाही. याच धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यतीचे केससाठी आपण स्वत: लक्ष घालावे, अशी विनंती राज्यमंत्री भेगडे यांनी यावेळी केली आहे.