पिंपरी : शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा बुधवारी डेंगीमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आठ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डेंगीमुळे की अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला, याबाबतचा अहवाल तपासणीसाठी वैद्यकीय विभागाकडे दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांना डेंगीची लागण झाली होती. २६ सप्टेंबरला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर २९ तारखेला डेंगीसदृश ताप असल्याचे आढळून आल्याने औंध येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याच दिवशी रात्री पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, किडनी आणि लिव्हर निकामी झाल्याने उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.खासगी रुग्णालयांमध्ये, तसेच पॅथालॉजीमध्ये जर डेंगी पॉझिटिव्हचा रुग्ण आढळला, तर त्या रुग्णालयांनी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे सॅम्पल पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, या शासन आदेशाची अंमलबजावणी होत नाही. म्हणून सर्वांना पत्र पाठविले आहे. गायकवाड ज्या रुग्णालयात पहिल्यांदा अॅडमिट झाले. त्या रुग्णालयाने आज रक्ताचे नमुने पाठविले, असे डॉ. रॉय म्हणाले.