पिंपरी : काँग्रेसचा गड म्हणून लौकिक असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला आहे. महापालिका क्षेत्रात गेल्या निवडणुकीत १४ नगरसेवक निवडून आले होते. विद्यमान नगरसेवकांपैकी ९० टक्के जणांनी पक्षांतर केले. तर एका नगरसेवकाचा अर्ज आॅनलाइन प्रक्रियेत रद्द झाला. त्यामुळे महापालिकेच्या आखाड्यात काँग्रेसचा एकही विद्यमान नगरसेवक रिंगणात नसल्याचे चित्र आहे. महापालिकेत गेली अनेक वर्षे काँग्रेसचे प्राबल्य होते. दिवंगत माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कालखंडात सत्तेत काँग्रेसला समान वाटा होता. त्यामुळे काँग्रेसचा गड म्हणून या महापालिकेस महत्त्व होते. सरांच्या निधनानंतर मात्र काँग्रेस फुटण्यास सुरुवात झाली. समान वाटेकरी असणारा पक्ष कमी होऊ लागला. याचे प्रमुख कारण म्हणजे रामकृष्ण मोरे यांच्यानंतर राज्य पातळीवरील कोणत्याही नेत्याने गांभीर्याने लक्ष दिले नाही. सत्ता असताना कार्यकर्त्यांना साधी प्राधिकरण समिती किंवा विशेष दंडाधिकारी पदही मिळाले नाही. त्यामुळे एकामागून एक गट काँग्रेसमधून बाहेर पडला. एकेकाळी सत्ताधारी असलेला काँग्रेसचे सद्यस्थितीत केवळ १४ नगरसेवक संख्या आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी जागावाटपावरून फिसकटली आहे. त्यामुळे महापालिकेच्या १२८ जागांपैकी काँग्रेसने ५९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची व अस्तित्वाची असणार आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेसमधून विद्यमान नगरसेवक नाही रिंगणात
By admin | Published: February 15, 2017 2:15 AM