पिंपरी - येथील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी भाज्यांचे दर स्थिर होते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला ग्राहक वाढण्याची अपेक्षा होती. या महिन्यामध्ये अनेक सण व हा महिना धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला असल्यामुळे बहुतांश लोक मांसाहार वर्ज्य करतात. परिणामी भाजीपाल्याला मागणी वाढते. मात्र, श्रावण सुरू झाला. तरी भाजीपाला घेण्यासाठी मंडर्ईमध्ये ग्राहक कमी दिसत होते. त्याचप्रमाणे आवकही वाढल्यामुळे या आठवड्यात भाजीपाल्याचे दर स्थिर होते. तर काही भाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाले होते. तसेच या महिन्यामध्ये अनेक उपवास केले जातात, त्याचाही परिणाम मागणीवर होतो. त्यामुळे भाज्यांचे दर स्थिर होते. श्रावण महिन्यामध्ये सोमवारी उपवास सोडण्यासाठी मेथीची भाजी महत्त्वपूर्ण मानली जाते, त्यामुळे मेथीच्या भाजीचे दर १५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मागील आठवड्याच्या तुलनेत वाटाण्याचे दर कमी झाले आहेत. मागील आठवड्यात वाटाण्याचे भाव ५० ते ६० रुपये प्रतिकिलो होते. त्यामध्ये घट होऊन ते ३० ते ४० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे राजमा, श्रावणी घेवडा यांचे ही दर स्थिर होते. हिरव्या मिरचीचे दर स्थिर असून, मिरची ५० ते ६० रुपये दराने विकली जात होती. श्रावण महिन्यामध्ये भाजीपाल्याची मागणी वाढते. मात्र आवक वाढल्याने भाव स्थिर होते.मागील आठवड्याप्रमाणेच फळांचीही आवक वाढल्यामुळे दर स्थिर होते. बाजारामध्ये सद्य:स्थितीत दोन प्रकारचे आंबे उपलब्ध असून, ८० व १५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.पालेभाज्यांचे भाव : कोथिंबीर : ५ ते ८, मेथी : १५, शेपू : १०, पालक : १०, मुळा : १५ , कांदापात : १०, तांदुळजा : १०, पुदिना : ५.फळांचे भाव : सफरचंद : १६० ते २००, आंबा : १५०(चौसा), ८० (निलम), पेरू : ६०, सीताफळ : ५०, पपई : ४०, डाळींब : ५०, मोसंबी : ७०, संत्री : १००, किवी : १०० (५ नग) व ६० (३ नग), ड्रॅगन फ्रुट : ५० (१ नग), पिअर : १००, २०० (परदेशी).फळभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर (प्रतिकिलो) पुढीलप्रमाणे :बटाटे : १५ ते २०, कांदे : २०, टोमॅटो : १५ ते १६, गवार : ४० ते ५०, दोडका : ४०, घोसाळी : ४०, लसूण : ४० ते ५०, आले : ६०, भेंडी : ३० ते ४०, वांगी : ३५ ते ४०, कोबी : २०, फ्लॉवर : ४०, शेवगा : ६०, हिरवी मिरची : ३० ते ५० व ५० ते ६०, शिमला मिरची : ४०, पडवळ : ४०, दुधी भोपळा : ३०, लाल भोपळा : २०, काकडी : २०, चवळी : ३५ ते ४०, काळा घेवडा : ६०, तोंडली : ५०, गाजर : ३५ ते ४०, वाल : ५०, राजमा : ४०, मटार : ३० ते ४०, कारली : ४०, पावटा : ४०, श्रावणी घेवडा : ४०, लिंबू : ४० ते ५० (शेकडा)
मागणीअभावी भाज्यांचे दर स्थिर, श्रावणानिमित्त मागणी वाढण्याची विक्रेत्यांना अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 2:03 AM