पिंपरी : कोट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांनी यापूर्वीही या प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले. त्यांच्याकडून या संदर्भातील कागदपत्रे जप्त केली. तसेच कर्ज देण्याच्या बहाण्याने आणखी किती जणांची फसवणूक केली याबाबत माहिती घेण्यात येत आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली.
राधिका यतीश आंबेकर (रा. पश्चिम मुंबई), संदीप रामचंद्र समुद्रे (वय ३७, रा. कल्याण पूर्व, ठाणे), जयजित रामसनेही गुप्ता (वय ३६, रा. डोंबिवली पश्चिम, कल्याण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीराम पिंगळे यांचा मित्र जयेश पाटील याने फेसबुकवर आलेल्या जलाराम इंटरप्रायजेस प्रायव्हेट फंडतर्फे कर्ज देण्यात येत असल्याबाबत जाहिरात पाहिली. त्या क्रमांकावर संपर्क केला असता पाटील यांना आरोपी महिलेने बाणेर येथे कार्यालयात बोलावले. फिर्यादी व त्याचे मित्र त्याठिकाणी गेले असता १ कोटीसाठी ५ लाख रुपये कॅश याप्रमाणे सिक्युरीटी डिपॉझीट दयावे लागेल, असे सांगून ४५ दिवसात लोन दिले जाईल, अशी माहिती राधिका आंबेकर हिने दिली. त्यांच्यावर संशय आल्याने फिर्यादीने हिंजवडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी माहिती घेतली असता कर्ज प्रक्रिया आणि कंपनी बेकायदा असून यातून नागरिकांची फसवणूक होत असल्याचे आढळले. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी कार्यालयात छापा मारून कंपनीचे १३ कॉम्पुटर, सात मोबाईल दोन कर्ज प्रकरण संबंधी कागदपत्रे जप्त केले. तसेच मॅनेजर महिलेला अटक केली. तिच्याकडे चौकशी केली असता तिने दिलेल्या माहितीनुसार इतर दोन साथीदारांना अटक केली. अधिक तपासात नवी मुंबई वाशी सेक्टर ३० येथे या दोघांनी यापूर्वी कंपनीची शाखा सुरू करून तेथेही बऱ्याच लोकांची फसवणुक केली असल्याची माहिती समोर आली.