पिंपरी : ऑनलाईन माध्यमातून ग्राहक शोधून त्यांना मुलींचे फोटो पाठवून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. यातील दलालास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २७) दिघी परिसरात केली.
जगन्नाथ उर्फ काका परशु ठोंबरे (वय ५५, रा. येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ ठोंबरे हा काका हे टोपण नाव वापरून व्हाट्सअपच्या माध्यमातून ग्राहक शोधत असे. त्या ग्राहकांना व्हाट्सअपवर मुलींची निवड करण्यासाठी फोटो पाठवत असे. ग्राहकांनी मुलींची निवड केल्यानंतर दिघी, आळंदी, भोसरी परिसरातील वेगवेगळ्या हॉटेल, लॉजमध्ये ग्राहकांना रूम बुक करायला सांगायचा. ठरलेल्या हॉटेल, लॉजवर रिक्षातून मुलींना पाठवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.
याबाबत अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षास माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून काका याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तीन मुलींची सुटका केली. आरोपीकडे दीड हजार रुपये रोख रक्कम, सहा हजारांचा मोबाईल, ५५ हजारांची रिक्षा आणि ९० रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ६२ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.