पिंपरी : मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्पा सेंटरवर छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. बालेवाडी- हिंजवडी रस्त्यावर भुजबळ चौक येथे शुक्रवारी (दि. २६) दुपारी ही कारवाई केली.
केतकी विजय खरात (वय २१, रा. जुनी सांगवी), असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्यासह संभाजी मोरडे (वय ४०, रा. वाकड), या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे उपनिरीक्षक धैर्यशील सोळुंके यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी हिंजवडी रस्त्यावर भुजबळ चौक, वाकड येथे द ॲड्रेस कमर्शिया या मॉल मध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या गोल्डन रिलॅक्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पाच हजार ६५० रुपये रोख रक्कम नऊ हजारांचा मोबाईल फोन, ५० रुपये किंमतीचे इतर साहित्य असा एकूण १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, उपनिरीक्षक प्रदीप सिसोदे, धैर्यशील सोळंके, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.