पिंपरी : शहरातील तरुणांना व्यवसनाधीन करण्यासाठी राजस्थानमधून अफुचा चुरा आणून विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून न ५८.२८८ किलो वजनाचा अफूचा चुरा आणि अन्य साहित्य, असा एकूण १६ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी महाळुंगे गावात ही कारवाई केली.
राकेश जीवनराम बिष्णोई (वय २४), कैलास जोराराम बिष्णोई (वय २३), मुकेश गिरधारीराम बिष्णोई (२३, तिघेही सध्या रा. महाळुंगे, ता. खेड, मूळ रा. राजस्थान), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांना २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच अविनाश पानसरे यांच्या विरोधात देखील महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिलकुमार जाट (रा. राजस्थान) याचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे काहीजण अफूचा चुरा आणून त्याची विक्री करण्यासाठी साठवणूक करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. यात तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५८.२८८ किलो अफूचा चुरा, एक टेम्पो, चार मोबाईल फोन, ८२ सिलेंडर टाक्या, एक वजनकाटा, एक मिक्सर, रिफिलिंग पाईप, सिलिंग पॅकिंग आणि रोख रक्कम, असा एकूण १६ लाख ७० हजार १२२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सहायक पोलिस आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक राजन महाडीक, ज्ञानेश्वर दळवी, पोलिस अंमलदार प्रदीप शेलार, अशोक गारगोटे, बाळासाहेब सूर्यवंशी, मयूर वाडकर, संतोष भालेराव, दादा धस, अजित कुटे, रणधीर माने, मितेश यादव, पांडुरंग फुंदे, बाळू कोकाटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
भाडेकरार न केल्याने गुन्हा
अविनाश पानसरे याने त्याचे गोदाम बिष्णोई यांना भाडेकरार न करता दिले. या गोदामात पोलिसांनी कारवाई केली असता, संशयित आरोपी हे घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना मिळून आले. तसेच अफुचा चुरा विक्रीसाठी पॅकिंग करताना मिळून आले. भाडेकरार न करता गोदाम दिल्याप्रकरणी अविनाश पानसरे याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गॅस सिलिंडर रिफिलिंगचाही ‘उद्योग’
राजस्थान येथून अफुचा चुरा आणून शहरात त्याची विक्री करण्याचे संशयितांचे नियोजन होते. सिलिंडरच्या गाडीतून हा अंमली पदार्थ आणला जात असल्याचे तपासात समोर आले. अंमली पदार्थ विक्रीसह गॅस सिलिंडर रिफिल करून त्याची अवैध विक्री करण्याचाही प्रकार या कारवाईतून समोर आला.