पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. त्यात तीन महिलांची पोलिसांनी वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (दि. ५) दुपारी तीनच्या सुमारास मी टाईम स्पा, कस्पटे वस्ती, वाकड येथे केली.
अजय अंकुश गवई (वय २०, रा. वाकडकर वस्ती, हिंजवडी), सचिन सुरेश भिसे (रा. काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी टाईम स्पा या स्पा सेंटरमध्ये आरोपींनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी त्यांची उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई केली. अजय गवई याला पोलिसांनी अटक केली.