पिंपरी : विभागीय रेल्वे सल्लागार समितीची (डीआरयुसीसी) बैठक शुक्रवारी दुपारी पुणे रेल्वे विभागाच्या मुख्यालयात पार पडली. यावेळी पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या वाढवण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
प्रगती एक्स्प्रेसला चिंचवड येथे थांबा देणे, सिंहगड एक्स्प्रेसला पासधारक महिलांसाठी विशेष डब्याची व्यवस्था, मासिक पासधारकांसाठी अर्धी बोगी राखीव ठेवण्यात यावी, दुपारच्या वेळेस पुणे लोणावळा पुणे लोकल सुरू करण्यात यावी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस व इतर पुणे-मुंबई धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यातील मासिक पासधारकांच्या डब्यात नियमित तपासणी व्हावी, पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या वाढविणे यासह विविध मागण्या रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी केल्या.
यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे, वाणिज्य प्रमुख डॉ. मिलिंद हिरवे, जनसंपर्क अधिकारी रामदास भिसे, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निखिल काची, सुरेश माने, गोपाल तिवारी, बशीर सुतार, देवदत्त निकम, लालचंद ओसवाल, आप्पासाहेब शिंदे, अजित चौगुले, किशोर भोरावत, दिलीप बटवाल, शिवनाथ बियाणी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज हजारो प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. सकाळी सिंहगड एक्स्प्रेस गेल्यानंतर मुंबईला जाणारी दुसरी गाडी सुमारे दहा तासानंतर म्हणजे दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी कोयना एक्सप्रेस आहे. या मधल्या कालावधीत लांब पल्ल्याच्या गाड्यांना चिंचवड स्थानकात थांबा देणे गरजेचे आहे. पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसला पुणे स्थानकानंतर थेट लोणावळा येथे थांबा असून, या गाडीला शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यानच्या प्रवाशांना कनेक्टेड लोकल नाही, यामुळे प्रवाशांना पुणे येथून सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल पकडावी लागते आणि तासभर लोणावळा स्टेशन येथे ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे प्रगती एक्स्प्रेसला चिंचवड स्थानकात थांबा देण्यात यावा.
पिंपरी-चिंचवड, तळेगाव येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असून लाखो कामगार काम करतात. पुणे व पिंपरी-चिंचवडला शैक्षणिक संस्था असून हजारो विद्यार्थी आहेत. प्रवाशांची संख्या विचारात घेता लोणावळा ते पुणे दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे.
- इक्बाल मुलाणी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघ