लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या सभांना झालेली दिरंगाई व आचारसंहिता यामुळे शहरातील विविध मंजूर झालेली विकासकामे रखडली होती. काही कामे ठेकेदारांनी मुदतीत न केल्यामुळे रखडली होती. अशा ५६ कामांना नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विनादंड मुदतवाढ देण्यात आली. मागील सभागृहात कामात दिरंगाई करत वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला होता. याचे स्मरण नगरसेवक राजू बच्चे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, तसेच सभागृहास करून दिले. तेव्हा ही आपली पहिलीच पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने व काही तांत्रिक कारणांमुळे कामात दिरंगाई झाली असल्याने या वेळी ठेकेदारांना मुदतवाढ देऊ. मात्र, वारंवार कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांना यापुढे काळ्या यादीत टाकले जाईल, असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी ठणकावून सांगितले.तुंगार्ली येथील स्वा. सावरकर विद्यालयाच्या सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, गटनेते भरत हारपुडे, आरोही तळेगांवकर, शादान चौधरी, राजू बच्चे, सेजल परमार, दिलीप दामोदरे यासह नगरसेवक व स्वीकृत सदस्य उपस्थित होते. ४५ विषय साधक बाधक चर्चा करुन एकमताने मंजूर करण्यात आले. विषय ४५ असले तरी त्यामध्ये जवळपास पावणेतीनशे विषयांचा भरणा असल्याने पहिली सभा सात तास सुरू होती. विकासाच्या दृष्टीने ही सर्व कामे महत्त्वाची असल्याने ती विषयांमध्ये एकत्रित करुन घेण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष जाधव यांनी दिले.नगराध्यक्षा जाधव यांनी केवळ विरोधाला विरोध म्हणून विषयाला बगल देत विरोधक सभागृहात चर्चा रेंगाळत ठेवत असल्याने सभागृहाचा वेळ वाया जात होता. याकरिता त्यांना समज दिल्याचे सांगितले. (वार्ताहर)
रखडलेल्या ५६ कामांना मुदतवाढ
By admin | Published: January 26, 2017 12:16 AM