तळवडे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये कृष्णानगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, नेवाळेवस्ती, पूर्णानगर, शरदनगर, हरगुडेवस्ती, स्वस्त घरकुल योजना, अजंठानगर, दुर्गानगर आदी भागाचा समावेश करण्यात आला आहे. प्रभागातील काही भाग हा विकसित उच्चभ्रू वर्ग, तर उर्वरित भाग हा विकसनशील आणि मध्यमवर्गीय तसेच अल्पउत्पन्न गट असा आहे. कृष्णानगर येथे सुनियोजित विकास करण्यात आला असून बाकी प्रभाग अजूनही विकासाच्या बाबतीत मागे आहे.कृष्णानगर येथे प्राधिकरणाच्या वतीने स्वस्त घरकुल योजना राबविण्यात आली. त्या ठिकाणी इतके वर्ष होऊनही अजून संपूर्ण सोयी सुविधा पुरविणे शक्य झाले नाहीत, बऱ्याचशा सोसायटींना बंदिस्त सीमाभिंत नाही. पाण्याच्या टाकीचे बांधकाम नाही. सदर इमारतींच्या देखभाल दुरुस्ती कोणी करावी याबाबत साशंकता आहे. येथील कित्येक इमारतींचे छत गळत आहेत. उद्यानांची उभारणी करण्यात आली परंतु त्यांच्या नियमित स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत आहे.स्पाइन रोडचे काम करण्यात आले असले तरीही त्याच्या मधोमध असलेल्या जागेचा वापर नैसर्गिक विधी करण्यासाठी होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या रस्त्याच्या कडेला नेहमी कचरा विलगीकरणाचे काम सुरू असल्यामुळे नेहमी अस्वच्छता असते. पथारीवाले, टपरीधारक, तसेच मंडई हे प्रश्न भिजत पडले आहेत. गाळेधारक आणि महापालिका यांच्यात भाडेपट्टीवरून एकमत नसल्यामुळे मंडईचे बांधकाम पूर्ण होऊनही ती वापराविना पडून आहे. हॉकर्स झोनचा प्रश्नही प्रलंबित आहे.अजंठानगर, दुर्गानगर, घरकुल प्रकल्प, हरगुडे वस्ती येथे स्वच्छतेचे प्रश्न आहेत. दुर्गानगर येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण होत असतात. हे प्रश्न प्राधान्याने सोडविले जावेत. आकुर्डी ते चिखली मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. सदर मार्गावर पथारीवाले, भाजीवाले यांचे अतिक्रमण, तर दुकानांच्या समोर लावलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. (वार्ताहर)कृष्णनगर परिसरात १५ ते २० जेष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत. त्याचे सामाजिक उपक्रम नियमित सुरू असतात. त्यांना विरंगुळा केंद्र उपलब्ध झाल्यास त्यांच्या वतीने संस्कार वर्ग, सांस्कृतिक उपक्रम, आरोग्यदायी उपक्रम राबविता येतील. यासाठी परिसरात विरंगुळा केंद्र उपलब्ध व्हावे.- शिवानंद चौगुले, महात्मा फुलेनगरउद्यान, मेट्रो स्टेशन, शहर बस आगारासाठी आरक्षण असलेल्या जागेवर झोपडपट्टी वसली असून त्यांना विजमिटर,नळ कनेक्शन दिले आहेत. अशा आरक्षणाच्या जागा बळकावल्या गेल्या असल्याने बकालपणा वाढत चालला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या जागेचा विकास करत सुनियोजित विकास व्हायला हवा आहे.- शैलेश महाबळे, सिद्धी आनंद पार्कघरकुल चौकात वारंवार अपघात होत असतात. तेथे चौकाच्या बाजूच्या रस्त्यावर गतिरोधक असावेत. या परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी तोडफोडीचे प्रकार घडले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा सतत वावर असतो. त्यामुळे घरकुल परिसरात पोलीस मदत केंद्राची सोय असावी.- हरि बारगजे, माऊली सोसायटी, घरकुल.भाजीमंडई, टपरिधारक आणि पथारीवाले यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. भाजिमंडईचे काम पूर्ण होऊनही वापर होत नाही, गाळेधारक आणि महापालिका प्रशासन यांच्यात असलेला भाडेपट्टीचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावला जावा. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडणार नाही आणि मंडईचा वापर होऊन विक्रेते आणि ग्राहक यांची सोय होईल.- मधुकर ढोले, अध्यक्ष, शिवछत्रपती भाजी विक्री संघहोतकरू विद्यार्थ्यांना घरात आणि सोसायटी परिसरात अभ्यास करण्यास योग्य वातावरण व पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यांसाठी परिसरात स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र तसेच मार्गदर्शन केंद्र आणि ग्रंथालय व्हावे.- आर्या देशपांडे, महात्मा फुलेनगरपोस्ट आॅफिस मध्यवर्ती ठिकाणी असावे, सध्याचे पोस्ट आॅफिस अंतर्गत ठिकाणी असल्याने ते सहज सापडत नाही. त्यामुळे पोस्ट आॅफिस मध्यवर्ती ठिकाणच्या शासकीय इमारतीत असावे.- यशवंत कन्हेरे, महात्मा फुलेनगर
घरकुल योजनेत पुरेशा सोयीसुविधा पुरविण्यात अपयश
By admin | Published: February 05, 2017 3:26 AM