पिंपरी : चारचाकी वाहनातून विनामास्क फिरत असल्याने वाहतूक पोलिसांनी चाैकशी केली. त्यावेळी बनावट ओळखपत्र दाखवून सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असल्याचे सांगितले. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याची तोतयेगिरी उघडकीस आली. जाधव सरकार चाैक, स्पाईन रोड, चिखली येथे मंगळवारी (दि. २) सायंकाळी हा प्रकार घडला. प्रवीण लक्ष्मण सूर्यवंशी (वय ३३, रा. मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा), असे आरोपीचे नाव आहे. निगडी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सुनील शिवाजी गायकवाड (वय ४०) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी जाधव सरकार चौकात वाहतूक नियमन तसेच विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करत होते. त्यावेळी एका चारचाकी वाहनातील दोघांनी मास्कचा वापर केला नसल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी चारचाकी वाहन थांबवून कारवाई करण्यास सुरवात केली. त्यावेळी चारचाकी वाहनात आरोपी सूर्यवंशी होता. मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर (एसीपी) मी कार्यरत आहे, अशी बतावणी आरोपी सूर्यवंशी याने केली. तसेच फिर्यादी यांना त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले.
तोतया एसीपीचा भांडाफोड केल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे, उपनिरीक्षक एस. एस. राऊत, पोलीस कर्मचारी सुनील गायकवाड, कुर्मदास दहिफळे, लक्ष्मण कोल्हे, शंकर कशाळे यांचा विशेष सत्कार केला. तसेच त्यांच्या पथकाला बक्षीस जाहीर केले.
फोटोतील ‘स्टार’मुळे संशय...
आरोपी सूर्यवंशी याने दाखविलेल्या ओळखपत्रावरील फोटोत त्याच्या खांद्यावर राजमुद्रा व स्टार दिसले. त्यावरून आरोपीने सांगितलेले पद आणि त्याच्या खांद्यावरील स्टार यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे ओळखपत्र बनावट असल्याची फिर्यादी गायकवाड यांना शंका आली. त्यानंतर कुदळवाडी पोलीस चाैकीत नेऊन चाैकशी केली असता, आरोपी याने एसीपी असल्याचे बतावणी केल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच टोल नाक्यांवर टोलचे पैसे न देता त्याने शासनाची फसवणूक केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.