पिंपरी : बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच बनावट नोटांचे प्रकरण ताजे असतानाच शहरात पोलिस चारित्र्य पडताळणीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षक तसेच कामगारांना ५०० रुपयांत बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याचे तपासातून उघडकीस आले. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी तरुणाला अटक केली. त्याच्याकडून बनावट ५१ प्रमाणपत्रे जप्त केली.
गणेश संजय कुंजकर (२४, रा. बेघरवस्ती, भुईंज, ता. वाई, जि. सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कुंजकर दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास असून खासगी कंपनीत तो कामाला आहे. दरम्यान, कामगार पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्याने त्याचे नाव व संपर्क क्रमांकासह पत्रके छापली. यातूनच सुरक्षारक्षकांना जास्त मागणी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्याने सुरक्षारक्षक पुरविण्याचे ठरविले. मात्र, त्यासाठी संबंधित कामगार किंवा सुरक्षारक्षकाची पोलिस पडताळणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्याला समजले.
दरम्यान, पोलिस पडताळणी प्रमाणपत्राबाबत त्याच्याकडे काही जणांनी विचारणा केली. त्यामुळे त्याने काही जणांच्या मूळ प्रमाणपत्रावरून मोबाइलमध्ये ‘स्क्रिन शाॅट’ घेतला. त्यात लॅपटाॅपवर ‘एडिटिंग’ करून मूळ प्रमाणपत्रावरून बनावट प्रमाणपत्र करून काही जणांना दिले. केवळ ५०० ते ७०० रुपयांमध्ये बनावट प्रमाणपत्र तयार करून दिले. यात सुरक्षारक्षकांना दिलेले बनावट प्रमाणपत्र जास्त असल्याचे तपासात समोर आले.
गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुभार, उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलिस अंमलदार मनोजकुमार कमले, बाळु कोकाटे, अमित खानविलकर, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, गणेश महाडीक, सचिन मोरे, स्वप्नील महाले, विशाल भोईर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस
शहरातील एका सुरक्षारक्षक एजन्सीकडे एका सुरक्षारक्षकाने पोलिस पडताळणी प्रमाणपत्र जमा केले. हे प्रमाणपत्र संबंधित एजन्सीने पोलिसांकडे दिले. प्रमाणपत्र बनावट असल्याचे पोलिसांच्या सतर्कतेमुळे निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रहाटणीतील सुलभ कॉलनीतून गणेश कुंजकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच पोलिस चरित्र पडताळणीची ५१ बनावट प्रमाणपत्र जप्त केली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.