पिंपरी : भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) हा विशिष्ट समाजापुरता मर्यादित न ठेवता, इतर समाजघटकाला बरोबर घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संघटन बांधायचे होते. रिडालोसच्या माध्यमातून विविध घटकांना एकत्रित बांधण्याचा मीसुद्धा प्रयत्न केला. तो असफल झाला. डॉ. आंबेडकरांचा आरपीआय वाढविण्यात कमी पडलो, अशी कबुली देऊन माझ्या सभांना मोठी गर्दी व्हायची. परंतु त्याचे मतांमध्ये कधी परिवर्तन झाले नाही. त्यामुळे राष्टÑीय लोकशाही आघाडीबरोबर राहण्याकरिता भाजपाशी संलग्नता ठेवण्याची भूमिका स्वीकारली, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
पिंपरी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणानंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाले. त्याचा आरपीआयवर कितपत परिणाम झाला. याबाबत आठवले म्हणाले, भारत बंदचे श्रेय प्रकाश आंबेडकरांना मिळाले, वास्तविक पाहता, मंत्री या नात्याने बंदची हाक मी देऊ शकलो असतो. परंतु चळवळीतील एका नेत्याने बंदचे आवाहन केले, मी कार्यकर्त्यांना बंदच्या काळात संयम पाळण्याचे आवाहन केले. आरपीआयचे कार्यकर्ते कोठेही गेलेले नाहीत, ८० टक्के कार्यकर्ते अद्यापही माझ्याबरोबर आहेत. वंचित विकास आघाडीला फारसे यश मिळेल असे वाटत नाही.
आठवले म्हणाले, ‘‘पुढील काळातही भाजपाच सत्तेवर येईल. युतीबाबत भाजपा आणि सेनेत मतभेद सुरू आहेत. मात्र आगामी काळातयुती महत्त्वाची असून, शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी स्वत: पुढाकार घेणार आहे. लोकसभेच्या पूर्वीच्या जागा होत्या, तशाच पद्धतीने जागावाटपाचे नियोजन व्हावे, यादृष्टीने चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या कोट्यातील मुंबईच्या जागेवर मला संधी मिळाली होती, त्यामुळे या वेळी जागा वाटपात काही बदल होण्याची शक्यता आहे.’’कायदा संमत झाल्यामुळे मराठा आरक्षण मिळणारचआर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे. कायदा संमत झाला तरी न्यायालयात टिकणार नाही, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले आहे. कायदा संमत होऊनही आरक्षण टिकणार नसेल तर त्यांनी हे आरक्षण कसे टिकेल याचा पर्याय द्यावा, असे आठवले म्हणाले.राम मंदिराच्या मुद्यावर ते म्हणाले, राम मंदिर व्हावे, याबद्दल दुमत नाही. परंतु न्यायालयाने हिंदू आणि मुस्लिम समाजाला तेथील जागेची वाटणी करण्याबाबतचा निर्णय दिला आहे. त्यानुसार कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, असा निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. यवतमाळ येथील साहित्य संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सेहगल यांना निमंत्रण नाकारले, याबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.