नारायण बडगुजर
पिंपरी : झाडावरून पडून गंभीर जखमी झाल्याने तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूला मार लागल्याने शस्त्रक्रिया केली. मात्र, जगण्यासाठीचा हा लढा अपयशी ठरला. त्यामुळे तरुणाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र खचून न जाता त्यांनी समाजभान दाखवून तरुणाच्या अवयव दानाचा आदर्श निर्णय घेतला. त्यामुळे मरणानंतरही तो ‘नेत्र’रुपी जिवंत आहे.
प्रकाश दत्तात्रय बडगुजर (वय ४०, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ रा. साकळी, ता. यावल, जि. जळगाव) असे मरणोत्तर नेत्रदान केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, रविवार, दि. २३ जून रोजी प्रकाश आकर्डी प्राधिकरणातील एका झाडावरून जांभळे काढत होता. त्या वेळी तोल जाऊन तो झाडावरून पडला. तेव्हा त्याच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्याला निगडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रक्तस्राव झाल्याने त्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तरीही त्यात यश आले नाही. ब्रेनडेड असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही २४ तास उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नसून, रुग्ण दगावणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबाने दु:खाचा डोंगर बाजूला ठेवून अवयवदानाचा निर्णय घेतला.
पोटासाठी मिळेल त्या कामाची तयारीप्रकाश दत्तात्रय बडगुजर (वय ४०, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ रा. साकळी, ता. यावल, जि. जळगाव) असे मरणोत्तर नेत्रदान केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील दत्तात्रय, लहान भाऊ अविनाश यांनी प्रकाश यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. अविनाश बडगुजर म्हणाले, प्रकाश हा चिंचवड येथे कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामास होता. त्या पगारात घर चालविणे कठीण होते म्हणून तो झाडावरून जांभळे उतरविण्याचे काम करीत होता. मिळणाऱ्या मोबदल्यामुळे त्याच्या संसाराला हातभार लागत होता.
प्रकाश बडगुजर यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय इतरांसाठीही आदर्शवत आहे. अवयवदानासाठी प्रत्येकाने सकारात्मक राहिले पाहिजे. त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सध्या अनेक रुग्णालयात अवयवदानाची सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांनी मरणोत्तर अवयवदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे मत डाॅ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डाॅ. वैशाली भारंबे यांनी व्यक्त केले.