सांगवी : सांगवी परिसरातील जवळपास सारे चौक बेशिस्त वाहन लावल्यामुळे रहदारीस अडथळा ठरत आहेत. धोकादायक बेशिस्त वाहनांमुळे रस्त्यावर वाहने आडवी उभी लावण्याने मुख्य चौक वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध झाला आहे. कृष्णा चौक येथे संध्याकाळी हातगाडीधारक रस्त्यावर अडचण होईल अशा पद्धतीने दिसून येतात. नियम धाब्यावर बसवून नागरिक वाहने मुख्य चौक भागात लावत असल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून चौकातील वाहतूक कोंडी, छोटे मोठे अपघात रोजचे झाले आहेत.
बेशिस्त वाहन धारकांकडून पार्किंगचे व वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. सांगवीतील मुख्य चौकांमध्ये धोकेदायक स्थिती दिसून येते. सांगवी परिसरातील साई चौक, काटेपुरम चौक, कृष्णा चौक सारेच वाहतूक कोंडीने ग्रासले असून, पादचारी आणि छोट्या वाहनांची अडचण होताना दिसते. सांगवी परिसरात अनेक दृष्टीकोनातून नागरी सुविधा आणि सोयींचा विकास झाला. परंतु परिसरातील अतिक्रमण आणि त्यामुळे होणारी समस्या सोडविली नाही. परिसराची सुंदरता आणि विकासाला गालबोट लागलेले दिसून येते.तर नागरिकांची वाहने रस्त्यावर लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते हे रोजचे झाल्याने याचा मनस्ताप सहन करावा लागतो. पालिकेचे अतिक्रमण पथक आले कि आधीच खबर लागून सारे काही वेळे पुरता खाली होते आणि पुन्हा आहे तीच परिस्थिती दिसून येते. यामुळे पालिका प्रशासनाच्या प्रमाणिकपणावर बोट ठेवले जात असून यासाठी पालिकेकडून कायमचा एक अतिक्रमण निरीक्षक येथील भागात नेमावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.सांगवी व परिसरातील वाहनधारकांना वाहतूक पोलीस विभागाकडून सूचित करण्यात येत आहे की दुहेरी व बेशिस्त पार्किंग करू नये व तसे आढळल्यास आॅनलाइन खटले दाखल करण्यात येत असून स्वयंम शिस्त पाळणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.- नितीन जाधव, वाहतूक पोलीस निरीक्षक, सांगवी
अतिक्रमणाचा विळखासांगवी भागातील जुनी सांगवी व नवी सांगवी परिसरात स्वच्छ आणि प्रशस्त रस्ते विकसित झाले, उद्याने झालीत पण रस्त्यांवरील अतिक्रमण विळखा सांगवीत ग्रहणासारखा लागलेला दिसून येतो. काटेपुरंम चौक, कृष्णा चौक, साई चौक, फेमस चौक, शितोळे चौक, क्रांती चौक, नवी सांगवी मेन रोडवर गर्दीचे प्रमाण जास्त आहे.या भागातील सत्तर टक्के व्यवसायिक असून सकाळी आणि संध्याकाळी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते भाजी विक्रेते, हॉटेल, स्वीट मार्ट, बँक, फास्ट फूडवाले, सराफी असे सारेच व्यवसाय ह्या परिसरात असल्याने रस्त्यावर गर्दी व बेशिस्त पार्किंग दिसून येते यातील अनेक हातगाडी धारक आणि काही व्यावसायिक रस्त्यावर आपले व्यवसाय करतात त्यामुळे आधीच रस्ता लहान असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो.