लोकमत न्यूज नेटवर्कयेळसे : बौर-थुगाव रस्त्यावरील पवना नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. भाऊ सदाशिव तरस (वय ३५) असे त्याचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (दि. ५) साडेआठच्या सुमारास घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरस हे बौर येथून नातेवाइकाच्या शेतातून चिखलणी करून आपल्या घरी परतत असताना थुगावाच्या हद्दीतील रात्रीच्या वेळी रुंदीचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर खाली पाण्यात कोसळला. अंगावर ट्रॅक्टर पडून राहिल्याने तरस यांना बचावासाठी काहीच प्रयत्न करता आले नाहीत.हा अपघात मागून येणाऱ्या दुचाकीचालकाने पाहिला. त्याने घटनेची माहिती गावातील नागरिकांना दिली असता, गावातील सर्व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तरस यांचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. हा पूल सुमारे ५६ वर्षांपूर्वीचा असून, पुलाच्या कडेचे लोखंडी कठडे तुटल्याने हा अपघात झाला. तरी पूल दुरुस्तीची मागणी सातत्याने ग्रामपंचायत करीत असून, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने तरस यांचा नाहक बळी गेला असल्याचा आरोप केला जात आहे. भाऊ तरस हे थुगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्या मागे लहान भाऊ, २ बहिणी, पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे.
ट्रॅक्टर पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: July 08, 2017 2:17 AM