पिंपळे गुरव : शेतकऱ्यांच्या लुटीची व्यवस्था हजारो वर्षांपासून प्रस्थापित आहे. त्यामुळे अशा शोषित व्यवस्थेला टप्प्याटप्प्याने तडा देऊन बळीचे राज्य निर्माण करावे लागणार आहे. त्याकरिता अशा लुटारू व्यवस्थेला हद्दपार करण्याकरिता आपणा सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे उद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पिंपळे गुरव येथे केले. सुयोग कॉलनीमधील साई सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रकाश बालवडकर, खेड तालुकाप्रमुख जयप्रकाश परदेशी, पुणे जिल्हा बैलगाडा संघटनाध्यक्ष अण्णा भेगडे, साई प्रतिष्ठानाचे विश्वस्त प्रकाश ताटे, अॅड. योगेश पांडे, प्रा. जे. एल. शिंदे, संजय मराठे, श्यामल जगताप, सुवर्णा रेळेकर, सुधाकर राजे उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, ‘‘शेतीतून बाहेर पडणारी व्यक्ती ही शोषण आणि लूट करणाऱ्या व्यवस्थेचा भाग होऊ पाहत आहे. कारण त्या व्यवस्थेबरोबर राहिलो, तरच माझा प्रश्न सुटणार आहे हे त्याने जाणले आहे. त्यामुळे अशा लुटारू व्यवस्थेच्या विरोधात आपली लढाई आहे. कापसाच्या वेळी तूर किंवा अगदी बाकीचे सर्वच दुर्लक्ष करीत आहेत.’’ (वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या लुटारूंना हद्दपार करणार
By admin | Published: March 27, 2017 2:33 AM