लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शहरातील कालबाह्य अंतर्गत रिंगरोड रद्द करा, घरे नियमित करा, शास्तीकर १०० टक्के माफ करा या विविध मागण्यांसाठी घर बचाव संघर्ष समितीने गुरुवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भर पावसात लाक्षणिक उपोषण केले. घरे बाधित होणारे नागरिक मोठ्या संख्येने छत्री घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. या वेळी ‘हम सब एक है, घर बचाव संघर्ष समितीचा विजय असो, हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा, घर आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, घरे नियमित करा, रिंग रोड रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील प्रस्तावित रिंगरोडमुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, बळवंतनगर, थेरगाव आणि पिंपळेगुरव परिसरातील अनेक घरे पाडली जाणार आहेत. घरे पाडण्यास रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. परंतु, प्राधिकरणाने रिंगरोडवरील दुकाने खाली करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. घरे पाडण्यास तीव्र विरोध करत प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल : मानव कांबळे रिंगरोडवरून राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल, अशी टीका स्वराज्य अभियानाचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी केले. नागरिकांना बेघर करण्याचा प्रकार सुरू आहे. अगोदरच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात होती. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीही विश्वासघात करीत केसाने गळा कापण्याचा प्रकार केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत लढा थांबवायचा नाही, असे आवाहन करीत आमच्यावर कोणीही दडपण आणण्याचा प्रयत्न करु नये, असे कांबळे यांनी नमूद केले. मारुती भापकर व विजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
रिंगरोडबाबत पावसात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 4:25 AM