निगडी : प्राधिकरणाने विकसित केलेल्या पेठ क्र. २० कृष्णानगरमधील कृष्णानगर हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने प्राधिकरणाच्या आरक्षित जागेवर झोपडीधारकांचे झालेले अतिक्रमण व त्यामुळे येथील रहिवाशांना होणारा त्रास अशा अनेक समस्यांचे निराकरण होण्यासाठी कृष्णानगर हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता सतीशकुमार खडके यांना फेडरेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पेठ क्र २० मधील कृष्णानगर हौसिंग सोसायट्यामधील रहिवासी गेल्या १० वर्षांपासून सदर सोसायटीमध्ये राहत असून, सोसायट्यांच्या असलेले भूखंड बसस्थानक, मेट्रो स्टेशन , उद्याने, पार्किंग इत्यादीकामासाठी आरक्षित केले आहेत. येथे दिवसेंदिवस अनधिकृत झोपड्या व पक्की बांधकामे होऊन त्यांचे एका मोठ्या झोपडपट्टीत रुपांतर झाले आहे. तसेच अनधिकृत झोपड्या व बांधकामे रस्त्यावर आल्याने रस्त्यावर पूर्णपणे अतिक्रमण झाले आहे. बहुतांश फुटपाथ हे अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या व फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्याने रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. सदरील अनधिकृत व बांधकामे काढण्यासाठी वांरवार तक्रार करुनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. निवेदनावर चांगदेव कोलते, नागेश मंडकी, महेंद्र भालेराव, संतोषी मंडकी, शुभांगी काळे आदी रहिवाशांची स्वाक्षरी आहे. (वार्ताहर)
झोपडपट्टी हटविण्यासाठी उपोषण
By admin | Published: February 14, 2017 1:54 AM