पिंपरी: वडील पॅरालिसिसलने अंथरुणाला खिळलेले, आई गृहिणी, घरची परिस्थिती प्रतिकूल! त्यावर मात करून दिघी-आळंदी रस्त्यावरील अश्विनी अरुण कुऱ्हे या मुलीने बारावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. महाविद्यालयात पहिले येण्याबरोबरच तिने अकाउंट विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. ती सयाजीनाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
दिघी- आळंदी रस्त्यावर साई मंदिराजवळ सयाजीनाथ महाराज महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या अश्विनी कुऱ्हे हीने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याचबरोबर अकाउंट विषयात १०० गुण मिळविले आहेत. अश्विनी साईनाथनगर मध्ये वास्तव्यास असून वडील हे पोस्टात नोकरीस होते. मात्र, चार वर्षांपासून पॅरलिसिसमुळे ते अंथरुणाला खेळून आहेत. तर आई पुष्पा या गृहिणी आहेत. तिला दोन बहिणी आहेत. अश्विनीने दहावीला ८१ टक्के गुण मिळविले होते. तिच्या यशाबद्दल साईनाथनगरमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अश्विनी म्हणाली, 'दहावीपासून मी अभ्यासावर भर दिला होता. कोणत्याही प्रकारचा क्लास लावला नाही. शाळेशिवाय दिवसांमध्ये पाच तास अभ्यास केला. सातत्य ठेवले. प्रश्नपत्रिका संच सोडविले. माझ्या अभ्यासासाठी महाविद्यालयानेही प्रयत्न केले. यशाचे श्रेय शाळा आई-वडील भावंडांनी दिलेली साथ यास द्यायला हवे. मला खूप शिकायचे आहे. मी सीए फाउंडेशनला ऍडमिशन घेतले आहे.'
अश्विनीची आई पुष्पा कुऱ्हे म्हणाल्या, 'अश्विनी खूप हुशार आहे. तिने अभ्यास केला. तिचे यश आहे. तिला आम्ही खूप शिकविणार आहोत. आम्हांला मुलीचा अभिमान आहे.'
प्राचार्य राजकुमार गायकवाड म्हणाले, 'आमच्या शाळेमध्ये सर्वसामान्य गोरगरीब मुलांची मुले शिक्षण घेतात. अश्विनी कुऱ्हे हीने अत्यंत, कष्टाने, सचोटीने प्रयत्न केला. अभ्यास केला. त्यामुळे यश मिळाले. त्यामुळे शाळेचा लौकिक वाढवलेला आहे.'