पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून हॉटेलला ‘हायजीन रेटिंग’ देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, व्यावसायिकांमध्ये याबाबत जनजागृती केली जात आहे. ‘हायजीन रेटिंग’ प्रमाणपत्र मिळाल्याने हॉटेलचे मूल्यांकन होईल, तसेच आपण हॉटेलच्या स्वच्छतेबाबत किती काळजी घेतो, हे ग्राहकांना पटवून देता येईल, असे मत पुणे रेस्टॉरंट्स आणि हॉटेलीअर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
पुणे रेस्टॉरंट्स आणि हॉटेलीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, स्वच्छता ठेवल्याशिवाय ग्राहक हॉटेलमध्ये येत नाहीत. त्यामुळे सर्व हॉटेलचालकांना हॉटेल स्वच्छच ठेवावे लागते. पुण्यात अडीच हजारांहून अधिक हॉटेल असून, त्यांना स्वच्छता ठेवण्याबाबत नेहमीच सूचना दिल्या जातात. तसेच शासनाच्या ‘हायजीन रेटिंग’ला सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतत आहे. उपाध्यक्ष विश्वनाथ पुजारी म्हणाले, की शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. ९० टक्के हॉटेलमध्ये स्वच्छता राखली जाते.हॉटेल व्यावसायात स्पर्धा वाढत चालली आहे. त्यामुळे स्वच्छता व सेवा तपासून एफडीएकडून दिले जाणारे प्रमाणत्र हे आमच्यासठी पुरावा असणार आहे. तसेच ज्यांच्याकडून स्वच्छता राखली जाते. त्यांच्या पाठिवर शाब्बासकीची थाप पडणार आहे. केंद्र शासनाकडून मिळालेले हायजिन रेटिंगचे प्रमाणपत्र हॉटेलच्या दर्शनी ठिकाणी लावता येईल.त्यातून ग्राहकांना आकर्षित करता येऊ शकते.त्यामुळे हॉटेल असोसिएशनतर्फे आॅनलाईन अर्ज भरण्याबाबत जागृती केली जात आहे. असे हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी किशोर सरपोतदार यांनी सांगितले.