लोणावळा : तीन दिवसांच्या सलग सुट्यांमुळे लोणावळा शहर व पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली होती. मात्र पावसाअभावी लोणावळ्यातील सर्व धबधबे कोरडे पडल्याने पर्यटकांची निराशा झाली. शुक्रवारी गांधी जयंती व जोडून आलेला शनिवार व रविवार या सलग सुट्यांनी लोणावळा पर्यटकांनी गजबजला होता. भुशी धरण, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, राजमाची गार्डन, सनसेट पॉइंट, ड्युक्स नोज, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला यासह लोणावळा परिसरातील सर्व संग्रहालये पर्यटकांनी हाऊसफुल झाली होती. हॉटेल, सेनेटोरिअम, सेकंड होम, फार्म हाऊसफुल्ल झाल्याने व्यावसायकांनीदेखील आनंद व्यक्त केला. चिक्की खरेदीसाठी देखील पर्यटकांची तुंबळ गर्दी होती. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. मात्र लोणावळ्यात मागील दोन दिवसांमधील तुरळक पाऊस वगळता पाऊस न झाल्याने परिसरातील सर्व धबधबे वाहण्याचे बंद झाले आहे. भुशी धरणांच्या पायऱ्यावरून पाणी वाहणे थांबले असल्याने पर्यटकांना या सर्व आनंदाला मुकावे लागले. रखरखत्या उन्हात पर्यटक निर्सगाचा आनंद लुटत होते. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीने लोणावळ्यात राष्ट्रीय महामार्गावर व शहरातील रस्त्यांवर, तसेच द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात वाहतूककोंडी झाली होती. (वार्ताहर)
पावसाअभावी पर्यटक निराश
By admin | Published: October 05, 2015 1:45 AM