भोसरी : भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत शारदा कुमार गायकवाड (वय ४५) या महिलेवर सात जणांच्या टोळक्याने गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खुनी हल्ला केला. तलवार, कोयत्याने वार केल्याने महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकीय पुढाऱ्यांकडून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची पाठराखण केली जात असल्याचा आरोप संतप्त जमावाने केला आहे. बालाजीनगरमध्ये शारदा गायकवाड या महिलेवर खुनी हल्ला करणाऱ्या विशाल हाके (वय २६) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, अन्य सहा आरोपी फरार झाले आहेत. याच परिसरात गतवर्षी राम गोटे या इसमाचा खून झाला होता. त्या खून प्रकरणात ही महिला साक्षीदार आहे. न्यायालयात या प्रकरणी खटला सुरू झाला असून, त्यामध्ये साक्षीदार राहू नये, अशी धमकी देत आरोपींनी तिच्यावर खुनी हल्ला केला. त्यात महिला गंभीर जखमी झाली. (वार्ताहर)
बालाजीनगरात महिलेवर खुनी हल्ला
By admin | Published: May 28, 2016 4:22 AM