तळेगाव दाभाडे : शिरगाव येथील बस स्थानकावर स्त्री जातीचे अर्भक सापडले हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.१०) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला. संतोष गोपाळे ( रा. शिरगाव ता. मावळ यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हे शिरगावात मारुती मंदिराजवळ राहतात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर शेड बस स्थानक आहे.ते रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले असताना बस स्टॉप जवळ त्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. बस स्टॉपमध्ये जाऊन बघितले असता फरशीवर साचलेल्या पाण्यात पातळ कापडात गुंडाळलले स्त्री जातीचे 25 ते 30 दिवसांचे बाळ दिसले. त्यांनी तात्काळ शिरगावचे पोलीस पाटील आणि उपसरपंच यांना याबाबत माहिती दिली. बाळ पाण्यात असल्याने ते थंडीने काकडून गेले होते. संतोष यांनी आपल्या घरून मुलीचे सापडलेल्या बाळाला घातले. तसेच उपसरपंचांनी बाळाच्या दुधाची व्यवस्था केली. त्यानंतर सर्वांनी मिळून तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला. बाळाची वैद्यकीय तपासणी पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात असून तेथील अनाथ तिला बालकाश्रमात दाखल करण्यात आले आहे.
शिरगावमध्ये बस स्थानकात सापडले स्त्री जातीचे अर्भक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 7:01 PM