पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला रोखून सत्ता परिवर्तनासाठी भाजपा व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. उमेदवार निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना कमीत कमी ५०:५० जागांच्या फार्म्युल्यावर राजी आहे. मात्र, भाजपाने तब्बल १०० जागांचा दावा केल्याने चर्चेचे गुण्हाळ कायम राहिले आहे. गेल्या १० वर्र्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत निर्विवाद सत्ता आहे. या काळात शहरात अनेक विकास प्रकल्प उभारण्यात आल्याचा दावा करीत विकासाचा अजेंडा घेऊन राष्ट्रवादीचे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या कामांत कोट्यवधीचा भ्रष्टाचार राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व नगरसेवकांनी केल्याचा आरोप भाजपा व शिवसेनेचे नेते करीत आहेत. भ्रष्टाचार व भयमुक्त महापालिका करण्याचा अजेंडा घेऊन युतीचे नेते निवडणूक लढवीत आहेत. खासगी संस्थांचे सर्वेक्षण व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासानुसार भाजपा व शिवसेना युतीने निवडणूक लढविल्यास महापालिकेत सत्तापालट होईल अन्यथा सत्तापरिवर्तन अचडणीचे असल्याचे मत मांडले जात आहे. त्यामुळे इच्छा असो वा नसो, वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार युतीतील दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना चर्चा करावी लागत आहे. महापालिका निवडणुकीतील युतीसाठी औपचारिक बैठक शुक्रवारी आकुर्डी येथे झाली. त्या वेळी दोन्ही पक्षांचे खासदार, आमदार व शहराध्यक्ष उपस्थित होते. एक तासाच्या चर्चेनंतरही युतीवर ठोस निर्णय झालेला नाही. (प्रतिनिधी)
युतीसाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फार्म्युला?
By admin | Published: January 14, 2017 2:54 AM