पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची, हाणामारी होण्याची घटना सोमवारी (दि.१ )सायंकाळी पावणे सातला झाली. मात्र, मारहाणीचे कारण गुलदस्त्यात आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
कोरोना लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने सर्वसाधारण सभा झाली नव्हती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तीन महिन्याच्या तहकूब सभा पार पडल्या. तर, चौथी सभा गणसंख्येअभावी तहकूब झाली. सभा संपल्यानंतर नगरसेवक मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आले. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास तिथे भाजपचा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी बसले होते, त्याच ठिकाणी शिवसेनचे राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे आले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली, चढ्या आवाजात चर्चा सुरू होती. चर्चेचे रूपांतर हाणामारीत झाले. जोरदार हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मारहाण सुरू असताना भाजपच्या एका महिला पदाधिकारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भांडण थांबले.
दरम्यान, मारहाण नेमकी कशावरून झाली हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.भाजपचे पदाधिकारी हे भोसरीतील असून शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे वाकड येथील आहेत. या घटनेनंतर रात्री पोलीस महापालिकेत दाखल झाले होते, मडीगेरी याना चिंचवड च्या रुग्णालयात तर कलाटे बंधूंना पिपरीतील महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली नव्हती.......
खासगी वाटाघाटीच्या माध्यमातून भूसंपादनाचा विषय मागील स्थायी समितीत गाजला होता. तसेच गेल्या समितीतील टक्केवारीचा हिशेब मावळत्या अध्यक्ष यांनी सदस्यांना दिला नव्हता. या दोनपैकी कोणत्या कारणावरून हाणामारी झाली याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही.......... सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महापालिका भवनात भाजपा नगरसेवकास मारहाण झाली. ही बाब चांगली नाही, शोभनीय नाही, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत.".......शाब्दिक वाद झाला, "आम्ही कुणालाही मारहाण केली नाही, समोरची व्यक्ती आमच्या अंगावर धावून आली, असे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले