पिंपरी : रोटरी क्लब आॅफ चिंचवड व पिंपरी-चिंचवड महानगर चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ११ व्या रोटरी चिंचवड वयोगट अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत गौरव झगडे, दिगंबर जाईल, श्रावणी म्हेत्रे, अन्शुल बसवंती व राघव भार्गव यांनी अनुक्रमे १५, १३, ११, ९ व ७ वर्षांखालील गटाचे विजेतेपद संपादन केले.ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या मनोहर वाढोकर स्मृती सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात प्रथम मानांकित गौरव झगडेने सर्व ७ फेऱ्या जिंकून ७ गुणांसह निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या गटात कौस्तुभ मस्के-पाटील ५ गुण मिळवीत टायब्रेक गुणांच्या आधारे उपविजेता ठरला. विवेक खांडेभराड, गायत्री शितोळे, प्रणव जाधवर, आदित्य मुल्या, मनांश अरोरा, प्रसाद वाघुळदे, निहाल भाटिया व सुरभी शर्मा यांनी अनुक्रमे तीन ते दहा क्रमांकांत यश प्राप्त केले.१३ वर्षांखालील गटात दिगंबर जाईल सात फेऱ्यांमधून साडेसहा गुणांची कमाई करीत अजिंक्य ठरला. वेद मोने व ओम चोरडिया यांचे समान ६ गुण झाले. टायब्रेक गुणांनुसार वेद उपविजेता ठरला तर ओमला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. सौरभ म्हमाणे, चेतन पोटे, श्रेयांश शिंगवी, पार्थ मोघे, मानसी ढाणेकर, ओम जाधव, वैभव कदम, हे खेळाडू अनुक्रमे ४ ते १० या स्थानी राहिले.११ वर्षांखालील गटात श्रावणी म्हेत्रे, श्रेयस पूरकर व मिहीर सरवदे या तिघांचे ७ फेऱ्यानंतर समान ६ गुण झाले. टायब्रेक गुणांनुसार श्रावणी वरचढ ठरल्याने तिला विजेतेपद मिळाले. मुले व मुली एकत्र खेळत असलेल्या स्पर्धेत श्रावणीचे जेतेपद विशेष ठरले. श्रेयसला उपविजेतेपद व मिहीरला तृतीय स्थान प्राप्त झाले. आॅगस्टिय नेगी, तीर्थ शेवाळे, सिद्धेश थोरवे, ऋषभ जठार, सर्वेश सावंत, तन्मय चौधरी व पूर्वा होले यांनी अनुक्रमे ४ ते १० क्रमांकात यश प्राप्त केले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण रोटरी क्लब आॅफ चिंचवडचे अध्यक्ष अरविंद गोडसे व सचिव मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष विवेक भागवत व आभार प्रदर्शन सदाशिव गोडसे व सूत्रसंचालन मनीषा भागवत यांनी केले. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच नितीन शेणवी, उपपंच म्हणून विवेक भागवत व सहायक पंच म्हणून सदाशिव गोडसे, शरद घोगळे, उमेश खेंगरे, गुरुनाथ कुलकर्णी, सागर सुरवडे, मानसी देशपांडे, शुभम चतुर्वेदी व आदित्य भागवत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
झगडे, जाईल, म्हेत्रे विजेते
By admin | Published: December 26, 2016 3:13 AM