पिंपरी : दोन गटात वाद झाला. यात तीन जण जीव वाचविण्यासाठी काळेवाडी पोलीस चौकीत गेले. त्यावेळी काही जणांनी दगड मारून पोलीस चौकीची काच फोडली. तसेच पोलीस चौकीबाहेर मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. काळेवाडी येथे रविवारी (दि. १२) ही घटना घडली. याप्रकरणी सोमवारी (दि. १३) वाकड पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजी गुरुनाथ साळुंखे (वय ५०, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ओंकार कल्याण ढवळे (रा. चिखली), रितेश दिनकर ओव्हाळ (वय २२), नंदकिशोर उर्फ बंडू नितीन महाकाल (वय २४), सिद्धार्थ संजय जगताप (वय १९), ऋषिकेश शाम कुडवे (वय २४, सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात दरोडाप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडू महाकाल व रितेश ओव्हाळ हे फिर्यादीच्या बिअर शाॅपीमध्ये आले. आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला बिअर दे नाहीतर तुला मारून सर्व बिअर शाॅपी लुटून नेईल, असा दम आरोपींनी दिला. त्यानंतर बिअर शाॅपीमधील दोन हजार ५०० रुपये किमतीच्या बिअरच्या बाटल्या व टीन तसेच ब्रिझर असा ऐवज दरोडा टाकून जबरदस्तीने घेऊन गेले. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला.
याच्या परस्पर विरोधात ऋषिकेश शाम कुडवे (वय २४, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली. अमान शेख, सागर तेलंग, धनंजय काळे, अविनाश उर्फ काळ्या, शुभम मोहिते, यश देशमुख (सर्व रा. पिंपरी), अजय कांबळे (थेरगाव), आकाश पवार, सत्यम भारंबे, सैफ खान (तिघेही रा. काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करून मारहाण केली. आकाश पवार याने कोयता मारून ओंकार ढवळे याला जखमी केले. आरोपींनी कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पुढे कोणी याल तर ठार करीन, अशी धमकी आरोपींनी दिली. त्यामुळे फिर्यादी व त्यांचे दोन मित्र जीव वाचविण्यासाठी काळेवाडी पोलीस चौकीमध्ये जात होते. त्यावेळी आरोपींनी दगड मारून पोलीस चौकीची बाहेरील काच फोडली. तसेच तेथे मोठमोठ्याने आरडाओरडा केली. आम्ही इथले भाई आहोत, आमचा कोणी नाद करायचा नाही, असे म्हणून आरोपींनी दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.