पिंपरी : घरी जाण्यासाठी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी तिचा पती व सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी चौक, चिंचवड येथील बस थांब्यावर गुरुवारी (दि. २०) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित विवाहित महिलेने या प्रकरणी शुक्रवारी (दि. २१) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विवाहितेचा ३५ वर्षीय पती व ६५ वर्षीय सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास चिंचवड येथील शिवाजी चौकाजवळील बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत होत्या. त्यावेळी फिर्यादी महिलेचा पती व सासरा तेथे आले. घरी चल, असे जबरदस्ती म्हणून त्यांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली.
तुला कोण वाचवणार आहे, असे म्हणून आरोपी सासरा याने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन केले. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे तपास करीत आहेत.