पिंपरी: हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार केल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी हॉटेल मालक व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी येथील वैशाली नगरच्या हॉटेल गरीब नवाज येथे सोमवारी ही घटना घडली.
आशिष बाळू राऊत (वय २१, रा. मिलिंदनगर, पिंपरी), असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी सोमवारी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हॉटेल गरीब नवाजचा मालक आणि त्याचे चार साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही), यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत आणि त्यांचे मित्र नीलेश व तुषार हे तिघेजण हॉटेल गरीबनवाज येथे बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा हॉटेलच्या मालकाशी किरकोळ वाद झाला. त्यानंतर तेथे चारजण आले. तू का मालकासोबत भांडण करतो, असे म्हणत हाताने मारहाण केली. त्याठिकाणी असलेला ट्रे राऊत आणि त्यांच्या मित्राच्या डोक्यात मारला. त्यानंतर आरोपींपैकी एकाने कोयत्याने राऊत यांच्यावर वार केले.