पुणे : बनावट मुद्रांक देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न मुद्रांक विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे फसला. या बनावट मुद्रांक प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी किरण लडकत (वय ३२, रा. सोमवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, लडकत यांचा मुद्रांक विक्रीचा व्यवसाय आहे. जुन्या जिल्हा परिषद कार्यालयाजवळ त्यांचे यशोदा एंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. ५ जानेवारी रोजी त्यांच्याकडे आलेल्या एकाने त्यांना ५०० आणि १०० रुपयांचे दोन मुद्रांक दिले. या मुद्रांकावर नाव चुकलेले आहे असे सांगत ते बदलून देण्याची त्याने मागणी केली. त्याने दिलेले मुद्रांक खुपच जुने होते. नोंदवहीमध्ये पाहिले असता त्या क्रमांकाचे मुद्रांक विकलेले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मुद्रांक कार्यालयामध्ये जाऊन तपासणी केली असता त्या क्रमांकाचे मुद्रांक वेगळ्या व्यक्तीच्या नावाने विकलेले असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, मुद्रांक घेऊन आलेला व्यक्ती पसार झाला होता. लडकत यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे मुद्रांक नाशिकला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. हे मुद्रांक कोणी कोणाला विकले याची माहिती घेतली जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक उगले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बनावट मुद्रांक प्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: January 11, 2015 11:49 PM