- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करत आणलेले पे ॲण्ड पार्क धोरण अखेर गुंडाळण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ४ ठिकाणी सुरू असलेल्या पार्किंग ठेक्याची मुदत संपल्याने यापुढे पार्किंग धोरण राबविणार नसल्याचे पत्र ठेकेदाराने महापालिकेला नुकतेच दिले आहे. वाहनचालकांना शिस्त लागेल, वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ‘पे ॲण्ड पार्क’ राबविण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या जवळपास असून वाहनांची संख्या २४ लाख आहे. गेल्या तीन वर्षांत पावणेचार लाख वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे यांसाठी पे ॲण्ड पार्क धोरण राबविले.
पहिल्या टप्प्यात शहरातील ८० ठिकाणी ‘पे ॲण्ड पार्क’ करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात २० ठिकाणीच १ जुलै २०२१ पासून ‘पे ॲण्ड पार्क’ च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. वाहतूक पोलिसांना पाच टोईंग व्हॅन दिल्या. तरीही योजना बारगळली. काही महिन्यातच निर्मला ऑटो केअर या ठेकेदाराने उत्पन्न आणि कर्मचारी वर्गावर होणारा खर्च पाहता काम आपल्याला परवडत नसल्याचे सांगत २० पैकी १६ ठिकाणी राबविण्यात येणारे ‘पे ॲण्ड पार्क’वरून माघार घेतल्याने धोरण गुंडाळले.
चार ठिकाणांची मुदतही संपली...
चिंचवड गावातील चापेकर चौक, संत मदर तेरेसा उड्डाणपूल, नाशिक फाटा, निगडीतील उड्डाणपूल अशा चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘पे ॲण्ड पार्क’ सुरू होते; मात्र याचीही मुदत ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत होती. ती संपल्यानंतर निर्मला ऑटो केअर या ठेकेदाराने आपण काम थांबवत असल्याचे महापालिकेला पत्र दिले आहे.
क्षेत्रीय स्तरावर राबविणार धोरण...
शहरातील वाहतूक कोंडी आणि अस्ताव्यस्त पार्किंगचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. पे ॲण्ड पार्कचे धोरण त्यापैकीच एक आहे. हा उपक्रम पडला नाही तर तो क्षेत्रीय स्तरावर राबविण्याचे धोरण आखण्यात येत आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका