अखेर तिढा सुटला! चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 10:00 AM2023-02-07T10:00:45+5:302023-02-07T10:01:47+5:30
मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटनेही दावा केलेला होता
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवारीचा तीन दिवस सुरू असणारा तिढा सुटला असून नाना काटे यांना मंगळवारी सकाळी उमेदवारी जाहिर केली आहे. मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक जाहिर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास चोविस तास उरले आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून सोमवारी दिवसभर उमेदवारी जाहिर केली नाही. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार, निरिक्षक आणि आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी इच्छुकांची मनधरणी केली.
राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, माया बारणे, राजेंद्र जगताप हे इच्छुक होते. त्यांची मनधरणी करण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू होते. नेते आणि इच्छुकांमधील चर्चांची खलबते दिवसभर सुरू होती. तसेच या मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटनेही दावा केलेला होता. त्यामुळे तिघांपैकी नक्की हा मतदारसंघ कोणाला सोडला जाईल, याबाबत उत्सुकता होती. उमेदवारीचे घोंगडे भिजत पडले होती.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT@NANA_PATOLE
सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये रात्री बैठक झाली. त्यात उमेदवारीवर चर्चा करण्यात आली. रात्री बारापर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही. मतदार संघ राष्ट्रवादीला गेला आहे. मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.