किवळे : किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर किवळेतील मुकाई चौक ते रावेत भागात पावसाळ्यानंतर गेल्या महिन्यात रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण झाल्यानंतर एका इंटरनेट केबल कंपनीमार्फत आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी मुख्य रस्त्याचे पुन्हा खोदकाम सुरू झाले होते. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत पैशांचा अपव्यय होत असल्याची तक्रार केली होती. याबाबत छायचित्रासह ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत डांबरीकरण केलेला रस्ता खोदाईचे काम थांबवून पदपथ खोदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
महापालिकेने पावसाळा संपल्यानंतर मुकाई चौक ते लक्ष्मीनगर कॉर्नरपर्यंतच्या बीआरटी रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करून गेल्या महिन्यात बीआरटी रस्त्यावरील लक्ष्मीनगर कॉर्नर ते संत तुकाराम पुलाजवळच्या चौकादरम्यानचा मुख्य बीआरटी रस्त्यावरील सर्व लहान मोठे खड्डे व्यवस्थित दुरुस्ती करून या भागातील रस्ता डांबरीकरण केला होता. तसेच नुकतेच या रस्त्यावर पांढरे पट्टेही मारले होते. रस्त्याचे डांबरीकरण व पांढरे पट्टे मारण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. संबंधित रस्ता खोदण्यासाठी एका केबल कंपनीने शुल्क भरण्याची माहिती असतानाही या रस्त्यावर महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केला असल्याचे उघड झाले होते. वास्तविक किवळे - सांगवी बीआरटी मार्गावर पावसाळ्यात पडलेले खड्डे दुरुस्ती केले होते. संबंधित कंपनीकडून आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदकाम होणार असल्याने डांबरीकरण काम थांबवून आॅप्टिकल फायबर केबल टाकल्यानंतर डांबरीकरण करणे संयुक्तिक ठरले असते. मात्र पैशांचा अपव्यव होत आहे.महापालिकेकडे एका इंटरनेट कंपनीने किवळे-सांगवी बीआरटी भागातील रावेत, किवळे व पुनावळे बीआरटी भागात रस्ता खोदाईचे शुल्क भरून परवानगी घेतली होती. किवळेतील मुकाई चौक ते रावेत भागात उन्हाळ्यात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्यानंतर खोदलेला रस्ता व्यवस्थित दुरुस्त न केल्याने या भागातील रस्त्यावर विविध ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले होते. रावेत गाव ते पंप हाऊस चौकापर्यंतच्या (शिंदे वस्ती वळण) खोदलेल्या भागातील रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली होती.‘लोकमत’ने दुरुस्तीनंतर पुन्हा सुरू केली पालिकेने खोदाई ‘किवळे-सांगवी बीआरटी मार्ग : पैशांचा अपव्यय होत असल्याची तक्रार’ या शीर्षकाने छायाचित्रासह सविस्तर वृत्त मंगळवारी (दि. १८) प्रसिद्ध केल्यानंतर संबंधितांनी तातडीने दखल घेत रावेत गाव ते पंप हाऊस बसथांबादरम्यान डांबरीकरण केलेला रस्त्याची खोदाई थांबविली.या भागात आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी पदपथ खोदून केबल टाकण्याचे काम सुरू केल्याचे दिसत आहे. डांबरीकरण केलेला रस्त्याची खोदाई थांबविण्यात आल्याने रस्त्याची दुरवस्था रोखत पैशांचा अपव्यय थांबला असल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.