पिंपरी : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणक म्हणून कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवर अशी कामे सोपवू नका, असा आदेश संबंधितांना दिला आहे. याबाबत लोकमतने मंगळवारी ‘महापालिकेने अल्पवयीन मुलांना लावले कामाला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन महापालिकेने कारवाई केली. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम ‘ब’ प्रभाग कार्यालयांतर्गत सध्या सुरू आहे. यासाठी घरोघरी जाऊन माहिती घ्यावी लागते. हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने बिनचूक माहिती मिळणे अपेक्षित आहे. यासाठी महापालिका कर्मचारी, शिक्षक यांना प्रगणक म्हणून नेमण्यात येते. मात्र, या कामासाठी मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील (आयटीआय) विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली. यामुळे विद्यार्थी गोंधळून जात होते. याबाबतचे लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या सविस्तर वृत्ताची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांकडून असे काम करवून घेऊ नये, असा आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे. इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करा, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास वाचणार आहे. विद्यार्थ्यांना शहरात व्यवस्थित माहिती मिळत नव्हती. त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने अनेक ठिकाणी प्रवेशही दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आयटीआयचे विद्यार्थी हवालदिल झाले होते. (प्रतिनिधी)
अखेर लोकसंख्या नोंदवही अद्ययावतचे काम कर्मचाऱ्यांकडे
By admin | Published: December 22, 2015 11:55 PM