पिंपरी : फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज प्रकरण केले. मात्र फ्लॅटचे नंबर चुकीचे देऊन कर्ज देणाऱ्या हौसिंग फायनान्स कंपनीची २२ लाख ६५ हजार २२७ रुपयांची फसवणूक केली. पिंपरी येथे १८ जून २०१८ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी पाच जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी प्रशांत प्रल्हाद वाळेकर (वय ४०, रा. कात्रज, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. उमेश पोपट क्षीरसागर (वय ३२), जितेंद्र विठ्ठल गलांडे (वय ३२, रा. वडगाव शेरी, पुणे), कृष्णकुमार वसंत टापरे (रा. रविवार पेठ, पुणे), राजीव उज्ज्वल गायकवाड, उषा राजीव गायकवाड (रा. कात्रज, पुणे) असे आरोपींचे नाव आहे.
फ्लॅट खरेदी करण्यासाठी आरोपींनी कर्ज प्रकरण केले. त्यानुसार फिर्यादी वाळेकर यांच्या कंपनीने कर्ज मंजूर करून धनादेश देऊन आरोपींनी तो धनादेश वटवून कर्जाची रक्कम घेतली. मात्र बांधकाम साईटवर फ्लॅटला इतर वेगळेच नंबर देऊन कंपनीला चुकीची माहिती दिली. संबंधित फायनान्स कंपनीची २२ लाख ६५ हजार २२७ रुपयांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.