तळवडे : पावसामुळे निगडी-तळवडे मार्गावर रस्ता दुभाजकाच्या कडेला असलेला चिखल व माती साफसफाईची कामे सुरू आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर कोणत्याही सुरक्षा यंत्रणेशिवाय सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
शहरातील नागरिकांना निरोगी वातावरण मिळावे, त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहवे, यासाठी आरोग्य विभागातील सफाई कामगार, कचरा वेचक कामगार काम करत असतात़ परंतु इतरांना आरोग्यदाई वातावरण लाभावे यासाठी काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. कचरा वेचण्याचे काम करताना, साफसफाईची कामे करताना त्यांना जुजबी सुविधाही दिल्या जात नाहीत़ तरीही केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीचा चंद्र मिळावा म्हणून नाइलाजास्तव हे कामगार जीव धोक्यात घालून काम करत असतात. संबंधित अधिकारी, ठेकेदार मात्र त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेच्या असलेली सुरक्षा साधने पुरविण्याकडे काणाडोळा करत असल्याचे वास्तव आहे.
कचरा वेचक कामगारांना हातमोजे, मास्क, गमबुट, गणवेश आदी साधने दिली पाहिजेत़ रस्त्यावर धोकादायक ठिकाणी काम करणाºया कामगारांना हेल्मेट, वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर काम करणाºया कामगारांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावले पाहिजे़ परंतु तसे होताना दिसत नाही.निगडी-तळवडे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते़ अशा रहदारीच्या रस्त्यावर काम करताना साधे बॅरिकेड्स नसल्यामुळे कामगारांचा अपघात होऊ शकतो. काम करणाºया कामगारांना पुरेशी सुरक्षा साधने का पुरविली जात नाहीत? याकडे कोण लक्ष देणार?- विलास भालेकर, सामाजिक कार्यकर्ता, तळवडे