लोणावळा : लोणावळा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिवंगत राहुल शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने अटक झाली पाहिजे. पण या हत्येमागील प्रमुख सूत्रधार शोधून काढण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी( दि.७) केली.
लोणावळाचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिवंगत राहुल शेट्टी यांच्या कुटुंबियांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. शेट्टी यांच्या कुटुंबियांना धीर दिला. त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, लोणावळा सारख्या शहरात अशा प्रकारची खुलेआम हत्या होणार असेल तर ते फार गंभीर आहे. लोणावळा शहराची शांतता अशा घटनामुळे भंग होऊ शकते. दरदिवशी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात येत असतात, त्यामुळे हे शहर असुरक्षित राहिले तर त्याचा परिणाम येथील सर्वच व्यस्थेवर होईल. या हत्या प्रकरणाचा सखोल तपास कराच व पण या प्रकरणातील मुळ सूत्रधार कोण हे शोधून काढा अशी मागणी प्रविण दरेकर यांनी येथील पोलिस अधिकार्यांकडे केली.
या प्रकरणातील गुन्हेगार कोणीही असले तरी त्याच्याविरुध्द कडक कारवाई झाली पाहिजे, हा प्रश्न आपण विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडू व या शेट्टी कुटुबियांना न्याय मिळवून देऊ असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.