पिंपरी-चिंचवड (वाकड) : मूळव्याध उपचार दवाखाना या नावाने बोगस दवाखाना चालवून रुग्णांना लुटणाऱ्या बोगस डॉक्टरवर वाकड ठाण्यात शनिवारी (दि १२) गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप विश्वास (रा नढे नगर, काळेवाडी) असे त्या ठग डॉक्टरचे नाव असून याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तरवील संगीता तीरुमनी यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर बोगस डॉक्टरने आपले शटर बंद करून पळ काढला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेली माहितीनुसार संदीप विश्वास हा काळेवाडी येथील तापकीर चौकात मूळव्याध उपचार दवाखाना या नावाने क्लिनिक चालवायचा मात्र या डॉक्टरने कुठलेही वैद्यकीय शिक्षण घेतले नसून त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाचे कुठलेही प्रमाणपत्र नाही, तरीही तो रुग्णांची उपचाराच्या नावाखाली लूट करीत असल्याची कुणकुण महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला लागली हाेती. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तरवील यांनी या रुग्णालयाची झाडाझडती घेतल्यानंतर वाकड पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार या बाेगस डाॅक्टरवर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीसनर अक्त १९६१ (३३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकडमध्ये बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 2:44 PM