पिंपरी : भंगार साहित्याच्या गोदामांना लागेल्या आगीत सुमारे १५० गोदामे व दुकाने जळून खाक झाली. चिखलीतील कुदळवाडी परिसरात शनिवारी (दि. ६) रात्री पावणेएकच्या सुमारास ही घटना घडली. आग लागलेल्या परिसरातील नागरिकांना वेळीच बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. आगीचे कारण समजू शकले नाही.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील कुदळवाडी येथील अनधिकृत भंगार गोदामाला आग लागल्याची माहिती शनिवारी रात्री पावणेएकच्या सुमारास मिळाली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब आणि जवान घटनास्थळी लागलीच दाखल झाले. गोदामांमध्ये प्लास्टिक, रबर, काच, कागद असे साहित्य असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या १२ गाड्या, पुणे महापालिकेची एक, चाकण नगर परिषदेची एक, चाकण एमआयडीसीची एक, चिंचवड एमआयडीसीची एक व टँकर घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामकच्या ८० जवानांनी ७० ते ७२ बंबांच्या साह्याने सकाळी सहापर्यंत आग नियंत्रणात आणली. सात ते आठ एकरचा परिसर आगीने बाधीत झाला.
प्रशासनाला माहिती मिळेना
चिखली कुदळवाडीतील अनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. महापालिकेने वेळोवेळी संबंधित व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. व्यावसायिक नोटीसींना प्रतिसाद देत नाहीत. ना हरकत प्रमाणपत्र घेत नाहीत. योग्य त्या उपाययोजनांची पुर्तता करत नाहीत. आग नियंत्रणात आणण्याची त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. आगीच्या घटनेनंतर नुकसान झालेल्या गोदामांची व त्यांच्या मालकांची माहितीही दिली जात नसल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.
पोलिसांचा फौजफाटा
आगीचे लोट पाहून नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. दीड ते दोन हजार नागरिक तेथे जमा झाले होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह इतर पोलिस ठाणे तसेच मुख्यालयाकडील फौजफाटा तैनात केला होता, तसेच पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
आगीत नुकसान झालेल्या गोदाम व दुकानांच्या मालकांची नावे व इतर माहिती कळू शकलेली नाही. उन्हाळ्यामुळे या भागात पुन्हा आग लागण्याचा धोका आहे. या गोदामांमुळे वारंवार आगीच्या घटना घडतात. व्यावसायिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. - मनोज लोणकर, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
आगीचे कारण समजू शकलेले नाही. अग्निशामक दलाच्या अहवालानंतर याबाबत गुन्हा दाखल करावा किंवा कसे याबाबत कार्यवाही होईल. - ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली