पिंपरी : पूर्णानगर, चिखली येथील हार्डवेअरच्या दुकानात शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी तज्ज्ञांकडून स्थळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्राथमिक तांत्रिक अभिप्राय दिला.
चिमणाराम चौधरी यांच्या दुकानात बुधवारी आग लागली. यात चौधरी यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला. घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, सहपोलिस आयुक्त डाॅ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, पोलिस उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे, सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट, महापालिका अग्निशामक विभाग प्रमुख विजय थोरात यांनी भेट दिली.
चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे कारण स्पष्ट होत नसल्याने तज्ज्ञांकडून अभिप्राय मागविले. महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकामकडील विद्युत विभाग, पाषाण येथील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (एनसीएल) तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे तज्ज्ञ म्हणून अभिप्राय देण्याची मागणी केली. त्यानुसार प्रथमदर्शनी शाॅर्टसर्किटमुळे दुकानात आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महावितरण म्हणते...
आगीची माहिती मिळताच पहाटे सहाच्या सुमारास इमारतीचा वीजपुरवठा खंडित केला. दुकानातील मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत असल्याचे, वीजमीटर व सर्व्हिस वायर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्युत निरीक्षक विभागाने पाहणी केली. पुढील चौकशी संयुक्त समितीकडून होत आहे, असे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.
दुकानातील फिटिंगमध्ये शाॅर्टसर्किट?
मीटरपर्यंत कोणतेही शाॅर्टसर्किट नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे दुकानातील फिटिंगमध्ये किंवा मोकळ्या असलेल्या इतर केबलमध्ये शाॅर्टसर्किट झाले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.