पिंपरी : अचानक लागलेल्या आगीमुळे तीन दुकाने खाक झाली. पिंपरी येथील मिलिंद नगर येथे बुधवारी (दि. १०) ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. (major fire at three shops in Pimpri)
महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेपूर्वी अडीचच्या सुमारास मिलिंद नगर येथे झुलेलाल घाट परिसरातील तीन दुकानांना आग लागली. किराणा, भंगार तसेच लाकडाच्या दुकानामुळे आगीने लगेच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे तीनही दुकानांतील साहित्य किराणामाल खाक झाला. ही बाब निदर्शनास येताच काही नागरिकांनी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशामक केंद्रातील तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या १४ जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली.
पहाटे सव्वापाच वाजता आग विझवण्यात यश आले. दरम्यान, आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट यामुळे येथील घरे व इमारतीच्या भिंती काळवंडल्या. आग लागल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी सतर्कता दाखवत शेजारील घरांमधील नागरिकांना बाहेर काढले. तसेच अग्निशामक दलाला माहिती दिली. सुदैवाने आगीत जीवित हानी झालेली नाही. या आगीत दुकानांमधील साहित्य खाक झाले. नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.